Saturday, March 26, 2016

आजकालची गाणी


जकालच्या गाण्यांमध्ये काही दम राहीला नाही बुवा!
जुन्या पिढीच्या तोंडून असे उद्गार निघताना आपण सर्रास ऐकतो. बऱ्याच अंशी ते खरेही आहे म्हणा. कारण जुनी गाणी अवीट गोडीची होती. पण हा जुनेपणा व्यक्तीसापेक्ष बदलताना दिसतो.
कुणाला ७० च्या दशकातली गाणी आवडतात तर कुणाला ८० च्या. कोणी थेट ५० ते ६० व्या शतकातल्या गाण्यांना गोड म्हणतो तर काहींना ९० च्या दशकातली गाणी ही आवडतात. असे म्हणतात कि १९५० ते १०६० हा काळ संगीताचे सुवर्णयुग वगैरे होता. पण याचा अर्थ असा नाही की नंतर आलेली गाणी चांगली नव्हती. प्रत्येक कालखंडाचे स्वतःचे असे एक वेगळेपण त्या त्या वेळेच्या गाण्यांमध्ये आपल्याला जाणवते. जुन्या काळाचे रेकॉर्डिंग करण्याचे तंत्र आजच्या एवढे विकसित नव्हते तरीही त्या वेळेची गाणी आपल्याला अजूनही श्रवणीय वाटतात यातच त्या गाण्यांचे यश आहे असे मला वाटते.
     आज रेकॉर्डिंग चे तंत्र फारच पुढे गेले आहे. सुरात नसलेले सूर सुरात बदलण्याचे ही आता सहज शक्य होते. संगीत दिग्दर्शकाचे काम सध्या कॉम्प्युटर ने खूपच सोपे केलेले आहे. पण गाण्याचा आत्मा ? तो मात्र हरवत चाललाय असे वाटते. आताची गाणी सुद्धा एकसुरीचवाटतात बऱ्याच गाण्यांचे चित्रपट वेगवेगळे आहेत याच्यावर विश्वास ठेवणे जड जाते. आणि ही गाणी महिन्या दोन महिन्यात स्मृतीआड जातात. काही अपवाद आहेत, नाही असे नाही. पण फारच कमी. आज एखाद्या पार्श्वगायकाला जर विचारले कि तुझा कोणता चित्रपट येतोय? तर बहुतांशी त्याला ते सांगता येत नाही. कारण हल्ली एकच गाणे संगीत दिग्दर्शक अनेक गायकांकडून गाऊन घेतात. (त्या त्या गायकाला त्याचे पैसे देऊन) आणि फायनली त्यातले एक ठेवतात. यामागे बहुदा कोणत्याही एका गायकाची मोनोपॉली होऊ नये असाच उद्देश असावा. आणि त्यात हल्लीच्या ओरिजिनल गाण्यांपेक्षा त्याचे डीजे व्हर्जनच अधिक गाजतात. मग ते गाणे कितीही शांत असले तरी त्यात डीजेच्या बीट्स टाकून पार्टी मध्ये वाजवणेबल बनवतात.
    आताच्या पिढीच्या नवोदित गायकांना तर तारसप्तकात किंचाळणे म्हणजे गायन असाच समज झालाय. लहान लहान मुलं ज्यांच्या व्होकल कॉर्ड्स अजून परिपक्व झालेल्या नाहीत ते अशी किंचाळणारी गाणीच गाताना दिसतायत टीव्ही शोज आणि इतर कार्यक्रमांमधून. आवाजात थरथर आणून गायचा नवाच ट्रेंड सध्या इथे पहायला मिळतोय. ज्यांना शास्त्रीय आणि सुगम संगीतातला गंध नाही असे गायक अशा प्रकारची गाणी गातायत सध्या. आणि असा थरथराट कॉपी करण्यात नवीन पिढी धन्यता मानते आहे.
कठीण आहे बाबा सगळेच.....
-
© सचिन सावंत 

No comments:

Post a Comment