Tuesday, November 22, 2016

प्रवास

  प्रवास हे जीवनाचे एक सूत्र आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही, कारण आयुष्य म्हणजेच एक प्रवास असतो जो जन्म आणि मृत्यू यामधील अंतर पार करण्याची क्रिया आहे. आणि या कालखंडालाच आयुष्य म्हणता येईल. आणि या कालखंडात अगणित प्रवास आपण सर्वजणच करीत असतो. फरक फक्त एवढाच असतो की काही जणांना प्रवास करणे आवडत नाही, काहींना आवडतं. प्रवास आवडणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त आहे. माणसाने पाण्यासारखं असावं, प्रवाही. एका जागी थांबल्यानंतर त्याचं डबकं होतं, आणि मग त्यावर शेवाळ जमू लागतं. माणसाचं सुद्धा काहीसं तसंच आहे.
    माणसाने नेहेमी प्रवास करावा. प्रवास करणारी माणसे ताजीतवानी असतात, शरीराने आणि मनाने ही. प्रवास कसाही करावा. ट्रेन, बस, लग्झरी कोच, टॅक्सी, रिक्षा, विमान, सायकल किंवा गेला बाजार चालत तरी नक्कीच करता येईल. साधन महत्त्वाचे नाही, प्रवास महत्त्वाचा आहे. कोणी मग आपले प्रवासवर्णन शब्दरूपात उतरवून लोकांसमोर मांडतो, लोकही आवडीने ही प्रवासवर्णनं वाचतात. मला सर्वात जास्त भावलेली प्रवासवर्णने आहेत कै. पु.ल. देशपांडे यांची. अपूर्वाई, पूर्वरंग यांमधून त्यांनी त्यांचा प्रवास अक्षरशः जिवंत केला आहे.
    ट्रेन ने प्रवास करायला मला फारसे आवडत नाही. ट्रेन चा प्रवास comfortable वाटतो लोकांना, पण माझ्या प्रवासाचे निकष वेगळे आहेत. ट्रेन च्या प्रवासामध्ये एक प्लॅटफॉर्म सोडला तर बाजूला माळरान आणि शेती याशिवाय बघायला काहीही नसते. By road जाताना बाजूला सगळं जग असतं, मग हा प्रवास जर एखाद्या bike वरून केला तर क्या बात है. फक्त सोबत कोणीतरी हवं.
   आजच्या घडीला मुंबईत रोज ड्युटी वर जायला लोकलच्या प्रवासात लोकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला येतो. काहीजण तर जीवावर उदार होऊन प्रवास करतात. त्यांना मानले पाहिजे.
This is called real मुंबईकर. त्यांना या प्रवासाबद्दल विचारलं तर डोक्यात दगडच घालतील. त्यात सुद्धा काहीजण विरंगुळा शोधतातच. पूर्वी वर्तमानपत्र वाचले जायचे, भजनं म्हटली जायची, पत्ते खेळले जायचे. आता कानात हेडफोन लावून स्मार्टफोन वर एखादा चित्रपट पाहिला जातो. दुनिया बदल चुकी है।
    एक मराठी कव्वाली आठवते आहे, "जीवन इसका नाम है प्यारे, तुझे है आगे चलना रे........"
-
© सचिन सावंत

No comments:

Post a Comment