Thursday, December 29, 2016

लोकल डायरी 1

   लोकलमधून पूर्वी मी रोज प्रवास करायचो यावर आता माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही. कारण सवय राहिली नाही आता पूर्वीसारखी. पूर्वी दरवाजात उभं राहण्यात एक प्रकारचं थ्रिल वाटायचं. मुंबई सीएसटी ते बदलापूर पर्यंतचा प्रवास उभ्याने आणि तो हि दरवाजात उभे राहून करायला का आवडायचं माहीत नाही. आता मात्र तो वेडेपणा वाटतो. नंतर नेरुळ ला राहायला आल्यानंतर नेरुळ पर्यंत दरवाजात असायचो. दरवाजात उभं राहताना सुद्धा आडाण्यागत उभं राहून चालत नाही, ती एक कला आहे. आणि मुंबईकरांना ती कला अवगत आहे. बाहेरचा एखादा आला आणि उतरायचे नसले तरी मध्येच उभा राहिला कि कामातून गेलाच समजायचं. त्यात जर दादर, कुर्ला, गोवंडी, ठाणे, अंधेरी, यासारखी स्टेशन्स असली तर विचारायलाच नको. येथे दरवाजातून बाहेर जाणे आणि आत येणे ऑटोमॅटिक होते. आपल्याला विशेष काही करावं लागतं नाही. हात वर असले तर खाली सुद्धा करता येत नाही. माझा एकदा खिशात ठेवलेला चष्मा खाली पडला होता, त्याचे दर्शन पण झाले नाही. त्यानंतर मात्र चष्मा डोळ्यावरच ठेवू लागलो. काही प्रेमवीर मात्र एवढ्या गर्दीत सुद्धा आपल्या प्रेमिकेला आपल्या बाहूंच्या safe custody मध्ये घेऊन दरवाजात उभे राहतात. त्यांच्या जिगरला मात्र सलाम केला पाहिजे.
आता ड्युटीवर जाणे येणे bike वर होत असल्याने लोकल चा प्रवास बंद झालाय. पण आठवणींचा पेटारा भरलेला आहे, एक एक आठवण बाहेर काढायचं ठरवलंय. बघूया ही डायरी किती भरली जाते.
-
©सचिन सावंत

No comments:

Post a Comment