Saturday, August 26, 2017

मनाचिये गुंती

माणसाचे मन💗 हा खरं तर चिंतनाचा विषय आहे. या विषयावर PhD सुद्धा करता येऊ शकते असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. या जगात मनाला कोणी समजू शकले आहे का ? मन कोणत्या वेळी कसे बदलेल, कोणत्या वेळी कोणता निर्णय घेईल हे प्रत्यक्ष ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकत नाही. मनाने घेतलेली कलाटणी, मनाने घेतलेले निर्णय ओळखणे केवळ अशक्य.

कोडं



कसं जगावं
कसं वागावं

कुणाशी, कधी, कसे, कोणत्या परिस्थितीत ?

सगळंच कोडं
न सुटता येणारं.............

एखाद्याच्या जीवाला घोर लावणारं
हृदयाची धडधड वाढवणारं
मनाची घालमेल करणारं

कुणाला समजणारं तर कुणाला न समजणारं
कुणाला समजेल की नाही याची वाट पाहणारं

कुणाला माझी किती काळजी आहे हे दर्शवणारं
तर कुणी किती दुर्लक्ष करतं हे दाखवणारं

किती प्रेम आहे याची मोजदाद करता येणारं,
तर किती प्रेम असायला हवे याचे ठोकताळे बांधणारं

किती उत्कटता आहे हे सांगणारं
तर कुठे उत्कटता दिसताच नाही याचे दुःख मानणारं

समोरचा कधी बोलेल याची वाट पाहणारं
तर कुठे मीच का बोलू याचा इगो बाळगणारं

सगळंच कोडं
न सुटणारं

कधी सुटेल हे कोडं ? याची वाट पाहणारं.
-
© सचिन सावंत
२६/०८/२०१७