Saturday, July 6, 2019

बोला काय प्रॉब्लेम आहे ?

हानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात MTNL च्या कस्टमर केअर executives भारी असतात. माझा नंबर 2 वेळा पोर्ट करण्या आधी तो Dolphin #trump चा होता. (म्हणजे आपले ट्रम्प तात्या नव्हे बरं) सध्या इतर सर्व मोबाईल कंपन्यांच्या customer care executive शी बोलायच असेल तर IVRS follow करावं लागतं. (म्हणजे 1 डायल करा 2 डायल करा वगैरे वगैरे) पण MTNL मध्ये मात्र 1503 डायल केले ली थेट कॉल उचलला जायचा.
एकदा काहीतरी प्रॉब्लेम असल्याने मी केला आपला फोन 1503 ला. एका बाईंनी उचलला. त्यांना मी माझ्या मोबाईलची जी काही समस्या होती ती सविस्तर सांगितली. मला 2 मिनिटे कॉल होल्ड करायला सांगून या मॅडम अंतर्धान पावल्या..
मी आपला वाट पाहतोय त्या कधी येतील याची. बरं या कालावधीत तिथल्या कॉल सेंटरच्या आजूबाजूचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. वास्तविक कॉल होल्ड वर ठेवल्यावर एखाद music सुरू करण्याचे एक बटन असते ते दाबून द्यायचं असतं. हा प्रोफेशनलिझम चा भाग असतो. आणि इथे मात्र मला बोलणे स्पष्ट ऐकू येत होते तिथल्या सर्वांचे... "काय ग, भेंडीच्या भाजीत वेगळं काही टाकलं होतंस का काल?" इथपासून मी त्या 10 ते 15 मिनिटात सगळ्या रेसिपीज आणि #इतर गप्पा फुकटात ऐकल्या. बरं फोन बाजूला ठेऊ शकत नव्हतो, कारण त्या मॅडमची 2 मिनिटे कधी संपतील याचा नेम नव्हता. बऱ्याच वेळाने शेवटी त्या मॅडम पुन्हा आल्या, त्यांनी रिसिव्हर उचलला आणि म्हणाल्या, "हॅलो ?" मी ही म्हटलं "हॅलो" त्यावर त्यांचा उलट प्रश्न, " बोला काय प्रॉब्लेम आहे?"
आता आली का पंचाईत. म्हणजे मी आधी सांगितलेलं पुन्हा एकदा सविस्तर मला सांगावं लागणार होतं. म्हणजे ही महिला माझा कॉल बाजूला ठेऊन चक्क गप्पा मारत बसली होती बहुतेक, आणि माझ्या कॉल बद्दल विसरून गेली होती. मग मी पुन्हा एकदा माझा प्रॉब्लेम #सविस्तर सांगितला. मला पुन्हा एकदा ती म्हणाली, "2 मिनिट कॉल होल्ड करा सर." आणि नंतर पुढच्याच सेकंदाला मला आवाज ऐकू आला, " अगं, जरा बघ गं याचा काय प्रॉब्लेम आहे ते. मला नाही समजत आहे....!"
-
#अक्षरछंदी | © सचिन सावंत
6/7/2019

No comments:

Post a Comment