Friday, December 2, 2016

जुन्या नोटा नव्या नोटा

आपले पी.एम. नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर पासून जुन्या (आता जुन्याच म्हणावं लागेल) ₹१००० आणि ₹५०० च्या नोटांवर बंदी आणली. या सर्व नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असे जाहीर केले गेले. असे केल्याने काळा पैसा बाहेर येईल वगैरे कारणे दिली गेली. नागरिकांनी सुद्धा या गोष्टीला अर्थात चांगला प्रतिसाद दिला. पण एवढे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी जो होमवर्क करायला हवा होता तो मोदी सरकार ने केला का ? हा आता प्रश्न पडतो. ₹२००० ची नवीन नोट छापणे खरंच आवश्यक होते का याचा गांभीर्याने विचार करायला हवा होता. आज २० ते २२ दिवस उलटून गेल्यावर सुद्धा बहुतांश ATM (कॅश नसल्याने) बंद आहेत. अथवा जी सुरु आहेत त्या मधून फक्त ₹२००० च्याच नोटा निघत आहेत. एकतर या नोटांचा रंग जात आहे (त्यावरून नोटांच्या प्रिंटिंग क्वालिटी ची कल्पना येऊ शकेल) बरं डिझाइन म्हणावं तर ते ही यथातथाच आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ₹२००० चे सुट्टे लवकर मिळत नाहीत. एखादी भाजी घ्यायची तर २००० चे सुट्टे ती भाजीवाली देईल का ?
काळा पैसा संपवायचा असेल तर ₹२००० ची नोट छापायलाच नको होती. आता कमी जागेत जास्त नोटा बसू शकतील. या नोटासुद्धा नंतर काही काळाने बंद होणार आहेत अश्या बातम्या येताहेत व्हाट्सअप आणि एफ बी वर. कळेलच लवकर.
₹५०० च्या नोटा सुद्धा छापल्यात म्हणे. पण मग त्या येणार कधी हातात ? कॅशलेस ट्रान्झेक्शन व्हायला पाहिजे हे ही मान्य, पण या मध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत त्या दूर करायला हव्यात. लोकांमध्ये कॅशलेस ट्रान्झेक्शन बद्दल जागरूकतेची गरज आहे. तरच हे सर्व शक्य होईल.
लोक आपल्याला होणाऱ्या त्रासापेक्षा देशहिताला प्राधान्य देत आहेत ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण सरकारनेसुद्धा लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. आणि सरकारला जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याला देशद्रोही ठरवले जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे जनतेची.

जाता जाता-
गेल्या ८ तारखेपासून (काही #सन्माननीय अपवाद वगळता) कोणत्याच बड्या आसामी ला #ATM च्या रांगेत उभे असलेले मी तरी पाहिले नाही, अथवा कुठे ऐकिवात सुद्धा नाही. सगळा काळा अथवा गोरा पैसा बहुतेक सर्वसामान्य लोकांकडे असावा.

© सचिन सावंत

No comments:

Post a Comment