Sunday, December 11, 2016

व्यक्ती तितक्या प्रकृती

    व्यक्ती तितक्या प्रकृती, की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ? काहीही असो, व्यक्ती बदलत जातात तसेच त्यांचे स्वभाव, त्यांच्या वागण्याची पद्धत, विचार करण्याची क्षमता, जगाकडे पाहायचा दृष्टिकोन सगळं काही बदलतं. असं आहे म्हणून बरं आहे नाहीतर सगळेच झेरॉक्स कॉपी सारखे सारखे वाटले असते.

     झेरॉक्स कॉपी हा शब्द ही तसा चुकीचाच. झेरॉक्स नावाची कंपनी आहे तिने फोटो कॉपी काढण्याच्या मशीन ची निर्मिती केली तर आपण त्या प्रक्रियेलाच झेरॉक्स कॉपी म्हणू लागलो. हे म्हणजे सर्वच टूथपेस्ट ला कोलगेट म्हणण्यापैकी झालं.

     तर विषय माणसांबद्दल होता. माणसंच व्यक्तिमत्व 90% ठरवतो तो त्यांचा चेहेरा. यावरूनच आपण प्रथमदर्शनी तो व्यक्ती कसा आहे हे ठरवत असतो. माणसाचा चेहेरा त्याचे व्यक्तिमत्व ठरवतो हे जवळजवळ सर्वांनाच पटेल. काही अंदाज चुकतात पण. यामध्ये कधी कधी आपला चुकीचा अंदाज असू शकतो, तर कधी एखादा आतल्या गाठीचा असतो. पण चेहेरा बोलतो हे मात्र नक्की. उगीच नाही फेयर अँड लव्हली सारखी उत्पादनं मुबलक प्रमाणात खपतात.

काही लोक्स प्रथमदर्शनीच आपल्याला आवडतात, तर काहींच्या नशिबी ते भाग्य नसतं. मला आठवतं, आमच्या कॉलेज मध्ये एक ख्यातनाम नाट्य दिग्दर्शक आले होते, नव्या टॅलेंट ला शोधायला. ऑडिशन मध्ये जे दिसायला उजवे होते ते सर्वप्रथम निवडले गेले. बाकीच्या इच्छुक उमेदवारांना मात्र विक्षिप्त टेस्ट पार कराव्या लागल्या होत्या. ( उदा. एका पायावर जास्त वेळ उभे राहणे ही काय नाट्य क्षेत्रासाठी अतिआवश्यक बाब आहे ? आणि असे असेल तर त्या गोऱ्या गोमट्या चेहेऱ्यांना का लागू पडला नव्हता तो नियम मला माहित नाही.) दिसायला बऱ्या असणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव पडतो हे मात्र नक्की. पण काही लोकांचे व्यक्तिमत्व त्यांच्या सहवासात राहिल्यावर उलगडते, काही व्यक्ती इतक्या उत्तम बोलणाऱ्या असतात की त्यांच्याकडे बहुतांश लोक आकर्षित होतात, मग ती व्यक्ती दिसायला इतकी बरी नसली तरीही. लहानपणी मी फारच अबोल होतो, खास करून नव्या लोकांशी बोलायला मी फारच बुजत असे. फार प्रयत्न करून मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केलाय. उत्तम बोलणारा म्हणजे उत्तम वक्ता असे नाही. कारण प्रत्येक उत्तम बोलणारा स्टेज वर उभे राहून भाषण करेलच असेही नाही. फक्त त्याच्या बोलण्याचे सर्वांना आकर्षण वाटते हे मात्र नक्की.

काही लोक प्रथमदर्शनीच आवडत नाहीत, मग ही व्यक्ती कितीही चांगली असली तरी आपला मेंदू त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक सिग्नलच देत असतो. या कॅटेगिरीमध्ये कोणीही येऊ शकते. अगदी आपले नातेवाईक सुद्धा. तसेच काही लोकांना स्पष्टवक्ते आवडत नाहीत. स्पष्ट बोलण्याने म्हणे त्यांची मने दुखावतात. (माझे काही मित्र माझ्या स्पष्ट बोलण्याने दुखावले? गेले आहेत. पण त्यांच्याबद्दल मला काही वाटत नाही कारण काही मित्र हे तोंडावर बोलणे आवडणाऱ्या कॅटेगिरी मधले आहेत, आणि त्यांची संख्या जास्त आहे.) काही व्यक्ती ह्या मार्केटिंग व्यवसायातल्या असतात. हे लोक आपल्या समोर, आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना आपले कस्टमरच समजतात. मग तो कोणीही असो. माझ्या नात्यातल्या अशाच एका व्यक्तीने मला आपला कस्टमर मानून वजन कमी करायचे एक फॉरेन चे औषध माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला होता. आधी दुसऱ्या एका नातेवाईकाला तासभर लेक्चर देऊन झाल्यावर आणि त्याने ते प्रॉडक्ट घेण्याचे मान्य केल्यावर स्वारी त्याला घेऊनच खुशीतच माझ्याकडे आली होती. साफ उतरवली होती मी त्याची. त्या औषधाने म्हणे २० ते २५ किलो वजन एका महिन्यात कमी होत होते. वास्तविक तो नात्यातला असल्याने जसे पहिल्याने ते प्रॉडक्ट घ्यायचे मान्य केले तसेच हा सुद्धा करेल अशी त्याची बहुदा अपेक्षा असावी. पण मी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. एका महिन्यात जास्तीत जास्त किती वजन कमी व्हायला पाहिजे याची मानके ठरलेली आहेत. आणि एका महिन्यात तो म्हणतो तसे २० ते २५ किलो जर कमी होत असेल तर ते शरीरासाठी वाईटच आहे.(ज्याने ते प्रॉडक्ट घ्यायचे मान्य केलं होतं त्याचाही जीव भांड्यात पडला होता माझ्या बोलण्यामुळे)

   काही लोक एकमेका साहाय्य करू या कॅटेगिरी मधली असतात तर काही अक्षरशः स्वार्थी असतात. काहींना साधी राहणी आवडते तर काहींना आपली (असलेली आणि नसलेलीही) श्रीमंती मिरावण्याचा षौक असतो. काही बोलून मोकळे होतात तर काही मनात ठेवून कुढत बसतात. काहींना सतत काहीतरी करण्याची धडपड स्वस्थ बसू देत नाही, तर काहीजण असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हे मानणारी असतात. आणि या कॅटेगिरीज न संपणाऱ्या आहेत. या बद्दल अजून बरेच काही लिहिता येण्यासारखं आहे, पण ते पुढच्या एखाद्या लेखात.

© सचिन सावंत

No comments:

Post a Comment