Saturday, August 26, 2017

मनाचिये गुंती

माणसाचे मन💗 हा खरं तर चिंतनाचा विषय आहे. या विषयावर PhD सुद्धा करता येऊ शकते असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. या जगात मनाला कोणी समजू शकले आहे का ? मन कोणत्या वेळी कसे बदलेल, कोणत्या वेळी कोणता निर्णय घेईल हे प्रत्यक्ष ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकत नाही. मनाने घेतलेली कलाटणी, मनाने घेतलेले निर्णय ओळखणे केवळ अशक्य.
समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. अशी उत्सुकता नसणारा माणूस या पृथ्वीतलावर शोधून सापडणार नाही. आणि यदाकदाचित जर सापडलाच तर तो धादांत खोटं बोलत आहे असं आपण खुशाल समजावं. समोरच्या माणसाच्यानात असलेले विचार आणि त्याच्या ओठावर असलेले शब्द यांच्यात तफावत असू शकते. तशी ती असेलच असे ही नाही, आणि नसेल असेही कशावरून ? अशा वेळी त्या व्यक्तीवर असलेला विश्वास हा महत्वाचा ठरतो.आणि त्याच विश्वासाच्या आधारावर समोरच्या व्यक्तीने सांगितलेले खरे की खोटे याचा निर्णय घ्यावा लागतो.
आणि असा विश्वास निर्माण होण्यासाठी ती समोरील व्यक्ती कशी आहे ? तिचा स्वभाव कसा आहे ? वगैरेच्या आधारावर आपल्याला त्या व्यक्तीबद्दलचे मत बनवावे लागते. त्याच आधारावर आपण काही अंदाज बांधू शकतो.

अशा वेळी माणसाला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी मदत करतो तो म्हणजे त्या व्यक्तीचा चेहेरा. कारण चेहेरा ही मानवाला मिळालेली अशी देणगी आहे की ज्याच्या आधारावर माणसाचा स्वभाव बऱ्यापैकी समजतो. एखादी व्यक्ती बोलण्यापूर्वी त्या व्यक्तीचा चेहेरा बोलतो. आणि त्याच आधारे आपण त्या व्यक्तीशी काय बोलावे ? कसे बोलावे ? बोलावे कि नाही ? ती व्यक्ती कशी असेल ? हे ठरवतो. in short त्या व्यक्तीच्या स्वभावाचे प्रतिबिंब आपण त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यात पाहतो. आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे First Impression हे Last Impression बनू शकते. आणि माणसाच्या मनावर कोणतीही गोष्ट उमटली तर ती पुसणे अथवा बदलणे अवघड असते. पण यामध्ये काही अपवाद सुद्धा असू शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चेहेरा हा ढिम्म असतो. त्या चेहेऱ्याला वाचता येत नाही. कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा. पोस्टाचे शिक्के जसे असायचे पूर्वीच्या काळी, अगदी त्याचप्रमाणे. तर एखाद्या व्यक्तीचा चेहेरा बेरकी असतो. मनात एक आणि चेहेऱ्यावर एक, म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात. चेहेऱ्यावरून अशा लोकांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज बांधता येणे केवळ अशक्य. पण हे अपवाद आहेत. बहुतेक वेळा आपल्याला समोरच्याचा स्वभाव ओळखायला त्याचा चेहेरा मदत करतो. पण यासाठी चेहेरा वाचण्याची कला सुद्धा माणसाला अवगत असावी लागते. तशी ती प्रत्येक माणसामध्ये असतेच कमी जास्त प्रमाणात.
     पण मग काहीजण असेही असतात ज्यांना समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरून त्यांच्या स्वभावाविषयी काहीच समजत नाही. अशा लोकांना मग आयुष्यात बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. बरेच वाईट अनुभव सुद्धा येतात. काही महाभाग तर याहून वरचढ असतात. म्हणजे चेहेरा तर वाचता येत नाहीच, पण समोरची व्यक्ती आपल्याशी वागताना वाईट वागते आहे, हे सुद्धा समजायला वेळ लागतो अशा लोकांना. बर एखादा त्या व्यक्तीविषयी काही सल्ला देत असेल तर ते सुद्धा ऐकायची मनःस्थिती नसते या लोकांची. अशांना काय म्हणावे ?
स्त्रियांच्या बाबतीत हा धोका मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकतो. उदा. एखाद्या स्त्रीला कोणीतरी सारखे सारखे call करून अथवा sms करून त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतात.या व्यक्ती कधी कधी जवळच्या असतात. म्हणजे अगदी नात्यातल्या नसल्या तरीसुद्धा मैत्रिणींचे मिस्टर वगैरे. अशा वेळी ती स्त्री मैत्रिणीला न सांगता त्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असेल तर समोरच्या व्यक्तीची भीड चेपते. आणि त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. जर अशा व्यक्तींचे चेहेरे वाचता आले असते, किंवा त्यांच्या वागण्यातून अंदाज लावला तर अशा गोष्टीसुद्धा होणार नाहीत. अशा वेळी स्त्रियांनी एकाच शब्द लक्षात ठेवायला हवा, तो म्हणजे 'NO'. कारण ज्यांना NO म्हणता आले त्यांचे अर्धे अधिक प्रोब्लेम आपोआप सुटतात. तर काही प्रोब्लेम उद्भवतच नाहीत. दुर्लक्ष केले तर ते वाढतात. नाही म्हणायला शिकणे अवघड आहे, पण अशक्य नाही.
-
© सचिन सावंत

No comments:

Post a Comment